तेलगाव दि.१९ (प्रतिनिधी)माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत देवठाणा येथील एका मोटारसायकल स्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. घटना स्थळावरून बीड जिल्हा पोलिस अधिक्षक जात असल्याने सदर अपघातातील जखमी ला पाहताक्षणी गाडी थांबवत जखमीला रुग्णालयात हलवले. रूग्णालयात दाखल करण्यापुर्वीच तो मृत झाल्याचे समजते.
बीड-परळी हायवेवर भोपा तलावा नजदीक मोटार सायकल एम एच १२ पी एम ४३४८ ही गाडी वाहनाने धडक दिल्याने चक्काचूर होऊन पडली होती. मोटार सायकल स्वार जयराम वारकड हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. हा अपघात झाला तेव्हा त्याच्या सोबत कुठलाही ओळखीचा पुरावा नसल्याने ओळख पटु शकली नव्हती. माञ त्यांच्या गाडीचा नंबर व्हाॅटसअॅपवर पाठवल्याने त्याची ओळख पटली. दरम्यान बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे सिरसाळा येथून बीड कडे जात असताना सदर अपघातस्थळी थांबत जखमी अवस्थेत इसम आढळून आल्याने तात्काळ रुग्णवाहिका मागवून जखमी जयरामला धारुर येथील शासकीय रुग्णालयात हलवले. माञ रूग्णालयात उपचार सुरू करण्यापुर्वीच तो मयत झाल्याचे समजते. रात्री अपघातस्थळी दिंद्रुड पोलीस घटनास्थळी हजर झाले होते.