BEED24

आता पॉझिटीव्ह कोरोना बाधितासाठी गृहविलगीकरणाचा पर्याय

मुंबई दि.७(प्रतिनिधी) कोविड १९ चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या व अति सौम्य किंवा लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी घरीच गृहविलगीकरण करण्याचा पर्याय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिला असुन याचा निर्णय दि.६ रोजी निर्गमित करत मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

भारत सरकारच्या दि. ७ एप्रिल २०२० रोजी काढलेल्या आदेशाच्या संदर्भान्वये कोविड १९ संशयित अथवा पॉझिटीव्ह परंतू सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठीच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सुचनां दिलेल्या आहेत. यापुर्वी प्रचलित नियमानूसार विलगीकरण सुरुच राहणार आहे. परंतू संशयित ज्यांचे प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत किंवा जे पॉझिटीव्ह आले आहेत परंतू अति सौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणे नाहीत, जे घरी सर्व व्यवस्था करु शकतात अशा रुग्णांना त्यांच्या स्वसंमतीने गृहविलगीकरण करता येणार आहे. मात्र आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहणार आहे. अशा स्वरुपाचे आदेश दि.६ रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढले असुन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. या निर्णयामुळे आरोग्य प्रशासनावर आलेला ताण कमी होवून इतर आरोग्य सुविधा वर झालेला परिणाम कमी होण्यास मदत होवून रुग्णाची भिती दुर होणार आहे.

Exit mobile version