किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) मध्यप्रदेश च्या मजूरांना सोडून दोन दिवस होवूनही शासनाच्या परवानगीच्या प्रतिक्षेत असलेल्या उत्तर प्रदेशच्या लोकांनी आज सकाळ पासुन स्वखर्चाने स्वतःच्या वाहनातून जाण्याची परवानगी मागितली आहे. परंतू पाच वाजत आले तरी अद्याप परवानगी मिळाली नसल्याने या लोकांची फरफट सुरुच असल्याचे दिसत आहे.
तीन दिवसांपुर्वी मध्यरात्री मध्यप्रदेश ला जाणाऱ्या जिनिंग मजूरांना शासनाने महाराष्ट्र राज्याच्या सिमेवर सोडण्यासाठी तीन बसेसची व्यवस्था केली होती. त्यापुर्वीपासुन शहरातील २३ उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले परप्रांतिय लोक शासनाकडे परवानगी मागत आहेत. शासनाच्या वतीने तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी या परप्रांतिय लोकांना शासनाच्या वतीने राज्याच्या सिमेपर्यंत सोडण्यात येईल असे सांगितले. मात्र अद्याप पर्यंतही शासनाकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. या लोकांनी तहसीलदार शिडोळकर यांच्याकडे स्वखर्चाने स्वतःच्या वाहनाने जाण्यासाठी परवानगी मागितली आहे. याबाबतीत नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी संबंधित लोकांची परवानगी बाबतची सर्व प्रक्रिया झाली असून वरिष्ठांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. आज सांयकाळ पर्यंत त्यांची परवानगी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.