BEED24

कंटेनमेंट झोन म्हणजे काय?

किल्लेधारूर दि.२२- गेली पाच महिने ऐकण्यात असलेल्या कंटेनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र बाबत अनेकांची प्रश्न आहेत. एखाद्या ठिकाणी कोविड-१९ चा बाधित आढळून आल्यास तो संपूर्ण भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करणे म्हणजे कंटेनमेंट झोन. सध्या या कंटेनमेंट झोनमुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम दिसुन येत आहे. आज प्रशासन कोरोना बाधित रुग्णाला ८ ते १० दिवसात घरी सोडत असताना तो परिसर मात्र १४ दिवस बंद ठेवण्यात येत असल्याने अनेकांसमोर कंटेनमेंट झोनचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंडियन काँन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) च्या सुचनेप्रमाणे एखाद्या ठिकाणी कोरोना बाधित आढळून आल्यास तो भाग बंद करणे, इतरांचा संपर्क तोडणे व रोगाचा प्रादुर्भाव संसर्ग किती झाला याचा आरोग्य विभागाकडून शोध घेणे या हेतूने कंटेनमेंट झोन केला जातो. सुरुवातीला हा परिसर काही किलोमीटरमध्ये बंद केला जात असे. अलिकडच्या काळात कंटेनमेंट झोन तिथली गरज पाहता रोगाचा प्रसार पाहता गल्ली पुरता ठरविला जात आहे. मात्र अशा कंटेनमेंट झोनमुळे सध्या अनेक शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ॲन्टीजन टेस्टमधून बाधित आढळलेल्या एखाद्या क्षेत्रातही कंटेनमेंट झोन केली जात आहेत. यामुळे शहरी भागात वाहतूक किंवा रहदारीसाठी सर्व प्रमुख रस्तेच बंद होत आहेत. परिणामी ठराविक ठिकाणी गर्दीची झुंबड उडालेली दिसुन येते. अनेक ठिकाणी वाहनांची चाके बंद पडली आहेत. प्रशासनाकडून केलेल्या कंटेनमेंट झोनचा त्या त्या भागातील नागरीक किती पालन करतात हे प्रत्यक्षात संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णामुळे परिसर बंदिस्त केला जातो तो रुग्णच सध्या आठ ते दहा दिवसात घरी परतत आहे. कंटेनमेंट झोन मात्र १४ दिवस पुर्णपणे बंद असतो. लोक सर्रास कंटेनमेंट झोनचा नियम मोडून आपले काम करताना आढळतात. शासनाने किमान रुग्णाची सुट्टी झाल्यावर सदरील भागात शिथिलता देवून केवळ रुग्णाचे घर १४ दिवसासाठी निगराणी खाली ठेवणे सोयीचे ठरणारे आहे. एका रुग्णाच्या आढळून आल्यामुळे शेकडो लोकांवर येणारे आर्थिक संकटातून काही प्रमाणात यामुळे सुट मिळेल. धारुर शहरात सध्या २५ कंटेनमेंट झोन आहेत. वित भर लाकूड अन हातभर ढलफी असा हा प्रकार आहे. अनेक रस्ते बंद, गल्ली बोळात बंद, मजूरांचे काम बंद, व्यवसायिकांचे व्यवसाय बंद, गोरगरीब लोकांच्या चुली बंद अशी परिस्थिती कंटेनमेंट झोनमध्ये पहायला मिळत आहे. प्रशासनाने रोगाचा प्रादुर्भाव, बाधितांची संख्या पाहता बाधित कुटूंबा पुरताच कंटेनमेंट झोन करुन लोकांची गैरसोय दुर करण्याची अपेक्षा सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Exit mobile version