किल्लेधारुर दि.१३(वार्ताहर) राज्यात कोरोना विषाणूचे संकट वाढतच चालले आहे. कोरोना आपत्ती निवारणासाठी तालुक्यातील भायजळी येथील सहशिक्षक अशोक मुंडे व त्यांच्या पत्नी सुनिता कराड तसेच बाप्पा तोंडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी किल्लेधारुर तहसिलदार यांच्याकडे धनादेश देऊन मदत केली.
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शासनातर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गोपाळपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक मुंडे, आशा कर्मचारी सुनिता कराड, बाप्पा तोंडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देऊन मदत केली. ही मदत किल्लेधारुर तहसिलदार व्ही.एस.शेडोळकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार सुहास हजारे, रामेश्वर स्वामी, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय देशमुख यांची उपस्थिती होती. या मदतीबद्दल तहसिलदार श्रीम.शेडोळकर यांनी सर्वांचे कौतुक केले.