किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) येथील कोविड-१९ उपचार केंद्रास बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आशोक थोरात यांनी भेट दिली. या भेटीत उपचार केंद्रात उपचार करण्यासाठी डॉक्टरची संख्या व परिचारिकांच्याच जागा रिक्त असल्याची धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली. उपचार केंद्रातील विविध सोयी व समस्यांची पाहणी करत योग्य त्या सुचना डॉ. थोरात यांनी यावेळी केल्या.
बारा दिवसांपुर्वी सुरु झालेल्या येथील शासकीय मुलींच्या वस्तिगृहातील कोविड-१९ उपचार केंद्रास आज दि.२१ शुक्रवार रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी भेट दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने व कोविड उपचार केंद्राचे आयुष अधिकारी डॉ. तफिल तांबोळी उपस्थित होते. उपचार केंद्रात सध्या एक वैद्यकीय अधिकारी, तीन आयुष अधिकाऱ्यांच्या व पाच परिचारिकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी तात्काळ स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याची सुचना यावेळी डॉ. थोरात यांनी केली. या उपचार केंद्रात १०० खाटांची व्यवस्था असुन इतर सर्व बाबीवर समाधान व्यक्त केले. सध्या या उपचार केंद्रात आजवर ५० रुग्णांची भरती झाली. यापैकी १४ जनांची सुट्टी झाली असून ४ जनांना इतरत्र हलवण्यात आले आहे. सध्या ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजित देशमुख, संदिपान थोरात यांचीही उपस्थिती होती.