BEED24

खते-बीयाणे पुरेशी असल्याने  शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करू नये – प्रा. मुंडे, नागरगोजे

किल्लेधारूर दि.२६ (वार्ताहर) आ. प्रकाशदादा सोळंके यांनी माजलगाव मतदार संघातील महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतलेली असून मतदार संघासह धारूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पुरेल ऐवढा खत व बियाणांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धारूर तालुकाध्यक्ष प्राध्यापक ईश्वर मुंडे व हनुमंत नागरगोजे यांनी केले आहे.

मंगळवारी धारूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रा.इश्वर मुंडे व हनुमंत नागरगोजे यांनी भेट देवूून तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांचेशी सविस्तर चर्चा केली. या वेळी तालुका कृषि अधिकारी शरद शिनगारे यांनी गावा गावातील शेतकऱ्यांनी आवश्यक खते, बियाणांची यादी करावी. शेतकरी गटातर्फे गावातील एका शेतकऱ्यांने बाजारात येऊन कृषी सेवा केंद्रातून खते -बीयाणे खरेदी करून शेतकऱ्यांना एकाच वाहनातून गावात किंवा बांधावर खते व बियाणे पुरवावीत. खते – बियाणांच्या भावाबाबत दुकानदारांना सक्त ताकीद दिलेली असून कोणीही चढया भावाने विक्री करणार नाही. तक्रार आल्यावर दुकानदारांवर तात्काळ कारवाई केली जाईल. खते – बियाणांच्या पावत्या शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवाव्यात अशी माहिती दिली. सध्या तालुक्यात १९१ नोंदणीकृत शेतकरी गट आहेत.

शेतकऱ्यांना नवीन गटाची नोंद करता येईल. यासाठी एकाच प्रकारचे उत्पन्न घेणारे १५ ते २० शेतकरी आवश्यक असून त्यांची यादी, ८ अ व ७ / १२ तसेच नोंदणी शुल्क १०८० रु तालुका कृषी अधिकारी, कार्यालयात भरावे. तालूका कृषि अधिकाऱ्याशी चर्चा करताना शेती योजनांचे थकीत अनुदान लवकर  प्राप्त व्हावे व नवीन योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे सुचविण्यात आले.  नवीन योजना येताच त्याची प्रसिद्धी केली जाईल व लवकरच थकीत अनूदान वितरीत करण्यात येणार असल्याचे शिनगारे यांनी सांगितले. यावेळी लालासाहेब तिडके, पं.स.उपसभापती प्रकाश कोकाटे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस रतन शेंडगे उपस्थित होते.

Exit mobile version