BEED24

जिनिंग मिल वरील कामगारांचा पायी प्रवास

किल्लेधारूर दि.११(प्रतिनिधी) येथील जिनिंग मिलवर मजूरीसाठी आलेल्या ५१ लोकांनी पायी प्रवास सुरु केला. यात एका दहा दिवसाच्या नवजात बालकासह मातेचाही समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने त्या मजूरांना येथील बसस्थानकात अडवून त्यांच्या पुढील प्रवासासाठी बसची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु केली आहेत.

परप्रांतियांच्या परतीच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. इतर जिल्ह्यातून अनेक रेल्वे परप्रांतियांना घेवून रवाना झाल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यात अद्यापही परप्रांतिय परवानगीच्या कचाट्यातच अडकली आहे. येथील तहसील प्रशासनाकडे यापुर्वीच सुमारे ८३ जनांनी परत जाण्यासाठी अर्ज केले आहे. यातील ५१ लोकांनी ज्यात ३६ जिनिंग मजूर व त्यांच्या लहान १५ बालकानी आज प्रशासनाच्या या कचाट्यातून सुटका करुन पायी जाण्याचा प्रयत्न केला. सदरील बाब पत्रकार अनिल महाजन, अतुल शिनगारे यांच्या लक्षात येताच बसस्थानकात असलेल्या पोलिस चौकीत पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांच्या हि बाब निदर्शनास आणून दिली. क्षणाचाही विलंब न करता पो.नि. धस यांनी सर्व मजूरांना विश्वासात घेत बसस्थानकात

बसविले. त्यांच्या चहा पानाची व्यवस्था करुन बस द्वारे त्यांना राज्याच्या सिमेवर पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या ५१ लोकात केवळ दहा दिवसाचे बाळ व मातेचा समावेश आहे. सदरील मजूर येथील गुरु राघवेंद्र जिंगिग व प्रेसिंग मिलवर मजूरीसाठी आल्याची माहिती मिळाली. गेल्या काही दिवसांपासून परप्रांतिय प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईला परेशान होऊन पायी प्रवास करत असल्याचे दिसत आहे. कालच येथून कोल्हापूर येथे काम करणारे ११ मजूर पायी जात असल्याचे आढळून आले होते. तालुक्यातून तामिळनाडूच्या ४, उत्तरप्रदेशच्या १०, कर्नाटक २ तर मध्यप्रदेशच्या ६८ मजूरांनी परतीसाठी तहसील कार्यालयात अर्ज केलेली आहेत.

Exit mobile version