BEED24

जिल्ह्यात आणखी चार मुंबईकर रुग्णांची भर

बीड : जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या  एकूण ११३ स्वॅब‌ पैकी चौघांचे अहवाल ‌पाॅझिटीव्ह‌ आले असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या चार कोरोनाग्रस्तांपैकी तीन पाटोदा तालुक्यातील असून एक वडवणीचा आहे. हे सर्वजण मुंबईहून बीड जिल्ह्यात आलेले आहेत.

पाटोदा शहरातील ७३ वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित झाला आहे. तर, वाहली (ता. पाटोदा) येथील दोन महिलांनाही (वय ६० आणि २७ वर्ष) कोरोनाची लागण झाली. त्यासोबतच वडवणी येथील ६७ वर्षीय वृद्धाचा अहवाल देखील पाॅझिटीव्ह‌ आला आहे. बुधवारी एकूण ११३ स्वॅब‌ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी चार पाॅझिटीव्ह‌, ९० निगेटिव्ह आले आहेत तर, १९ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. बीड, माजलगाव, गेवराई, केज, आष्टी पाठोपाठ कोरोनाने पाटोदा आणि वडवणी तालुक्यातही शिरकाव केला आहे.  दिवसेंदिवस जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंतच्या १२ रुग्णांसह आता बीड जिल्ह्यात एकूण १६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीड जिल्ह्यात आजवरची संख्या २४ झाली असून यातील एक जन दगावले आहे.

Exit mobile version