सोलापूर दि.२८(वि.प्र.) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी ११.४५ वाजता सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
गेल्या महिन्यात गुढीपाडव्या दिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळे पासून त्या सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र आज पावणेबारा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तसेच मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे. अन्यायग्रस्त, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त, निराधार महिलांच्या आधार बनलेल्या अपर्णाताई रामतीर्थकर संकटमोचक होत्या. त्यांनी अनेक महिलांचे तुटलेले संसार जोडले. महिलांना कायदेविषयक हक्क आणि अधिकार यावर त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्या स्वतः वकील असल्याने असंख्य महिलांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जाण्याने महिलांचा आधार गेला. रात्री अपरात्री अडचणीत सापडलेली महिला त्यांच्याशी फोनवरून मदतीसाठी हाक द्यायची तेंव्हा त्या धावून जात असत.