किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) शहरातील बसस्थानक ते स्टेट बँक या मेन रोडवर दररोज भरणाऱ्या बाजाराकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असून होणाऱ्या गर्दीमुळे अनापेक्षित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून याभागातील व्यापारीही यामुळे हतबल झाली आहेत. सदरील बाजारातून नगर परिषद कोरोनाला आंमत्रण तर देत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. गर्दी रोखून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा यामागचा उद्देश होता. दोन महिने उलटूनही जनतेतून मात्र गर्दी थांबवण्याचे प्रबोधन झालेच नाही असे दि.२६ पासून दिसत आहे. दि.२६ मे रोजी नवीन आदेश आल्याने स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडून लावण्यात आलेली अडथळे वाहतूकीस अडथळा होवू नये म्हणून काढण्यात आली. मात्र याचा गैरफायदा घेत फळ विक्रेते, भाजी विक्रेते व किरकोळ व्यवसायिकानी घेत बस स्थानक ते बँक या मेन रोड वर अक्षरशः
बाजार भरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हा परिसर नेहमीच गर्दीने गजबजलेला दिसत आहे. नगर परिषदेकडून या बाबीकडे डोळेझाक केली जात असून बाजार भरवण्यास मुक संमती दिली आहे. यापेक्षा शहरातील सोमवार व शुक्रवार हे दोन बाजार पुर्ववत सुरु करुन रोज होणारी गर्दी थांबवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.