BEED24

नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राची अहमदनगरमध्ये पहिली चाचणी

अहमदनगर दि.२४(प्रतिनिधी) संपूर्ण नवीन तंत्रज्ञान असलेल्या लेसर नियंत्रण प्रणालीवर चालणाऱ्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अहमदनगरमध्ये घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराची भेदक क्षमता वाढली आहे. लेसर नियंत्रित क्षेपणास्त्राची चाचणी अहमदनगर मधील के.के.रेंज येथे होण्याची ही पहिलीच वेळ होती.

चार कि.मी. पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची मंगळवारी एमबीटी अर्जुन रणगाडय़ावरून के. के. रेंज या लष्कराच्या क्षेत्रात चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्याचा वेध घेतला. अहमदनगर येथील आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूल या संस्थेच्या वतीने ही चाचणी घेण्यात आली.  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. संरक्षण सामुग्री आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. त्यात त्यांना यश येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. पुण्याच्या ‘आर्मामेंट रीसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ने रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र तयार केले असून त्यात ‘हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी व डेहराडूनच्या इन्स्ट्रमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ या संस्थेचाही वाटा आहे. लेसर नियंत्रण तंत्राचा वापर करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने तीन कि.मी अंतरावरचे लक्ष्य अचूक भेदले. क्षेपणास्त्रात ‘हीट वॉरहेड’चा समावेश असल्याने ते चिलखती वाहनाचाही अचूक वेध घेऊ शकते. चिलखती वाहनांना लक्ष्य करण्यासाठी या क्षेपणास्त्रात विशेष व्यवस्था करण्यात आली. अनेक प्रक्षेपण तळावरून हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकते. त्याचे तांत्रिक मूल्यमापन संरक्षण संशोधन व विकास संस्थेने तयार केलेला एमबीटी (मेन बॅटल टँक) ‘अर्जुन’ च्या माध्यमातून सुरू आहे.

Exit mobile version