बीड दि.१६(वार्ताहर ) मुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एका व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे. आजच जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी चेक पोस्ट वर स्टिंग करुन विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यावर पाळत ठेवली होती. त्यांचा अंदाज खरा ठरला असल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यात मागील महिन्यात सापडलेला रुग्ण नगर जिल्ह्याच्या जवळ होता. तसेच त्याच्यावर नगरमध्येच उपचार सुरु होते. जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील बफर झोन असलेल्या मुंबई, पुणे व औरंगाबाद मधून येणाऱ्याची संख्या पाहता कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात होईल अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात होती. आज पाठवलेल्या स्वॕब नमुन्यात गेवराई आणि माजलगाव या ठिकाणी कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईहून विना परवानगी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. या दोन रुग्णांचे कोरोना नमुने पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केली आहे. आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे. यामुळे आता नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे.