BEED24

रात्रीच्या अहवालामुळे झोपा उडाल्या…!

बीडः गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील थ्रोट स्वॅबचे अहवाल सतत रात्री अकरा नंतर येत असल्याने प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अहवालाची प्रतिक्षा करणाऱ्या पत्रकारांच्या झोपा उडाल्या असुन कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्ह्यातील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात अंबाजोगाई येथे सुमारे महिनाभरा पासुन प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. तत्पुर्वी जिल्ह्यातील सर्व स्वॅब लातूर येथील स्व. विलासराव देशमुख प्रयोगशाळेत पाठवली जात असत. लातूर येथून दररोज सांयकाळी ५ ते रात्री ९ च्या दरम्यान सर्व अहवाल प्राप्त होत असत. मात्र जिल्ह्यात तपासणी प्रयोगशाळा सुरु झाली अन याच काळात जिल्हा प्रशासनाने स्वॅब तपासणीची संख्या वाढवली. सुरुवातीला रात्री दहा पर्यंत उपलब्ध होणारे अहवाल हळूहळू मध्यरात्री पर्यंत येवू लागली. स्वॅब तपासणी वाढली असल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढले. जिल्ह्यात हॉटस्पॉट झोनमधून येणाऱ्या सर्वच प्रवाशांचे स्वॅब घेण्यात येत असल्याने प्रयोगशाळेत संख्या वाढली. यामुळे अहवाल येण्यात रात्री अकरा ते दिड पर्यंत वेळ लागत आहे. काही वेळा तर दुसरा दिवस उजाडल्यानंतर अहवाल प्राप्त झाली. मात्र याचा ताण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकारी, पत्रकार, पॉझिटीव्ह रुग्णाच्या कुटूंबातील लोक, गल्ली व गावातील नागरीकावर रात्री उशिरापर्यंत प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. यामुळे विशेषतः  खरा ताण आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचे दिसुन येत आहे. पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनेत प्रशासनातील अनेक यंत्रणाचा सहभाग असतो. याबाबत प्रशासनाकडून अहवालाच्या बाबतीत नियोजन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version