BEED24

सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करण्यास परवानगी

मुंबई, दि २६ : शासनाने मिशन बिगिन अगेन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. बीड जिल्ह्यात यापुर्वीच ही सुट देण्यात आलेली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या भागासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलुन्स, आणि ब्युटी पार्लर्स दि. २८ जून २०२० पासून सुरु करता येतील. मात्र या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

√ केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादीत सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधीत इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.
√ दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षीत साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
√ ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.
√ फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल.
√ उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.

Exit mobile version