BEED24

बीड जिल्ह्यातील 39 भाविक अमरनाथमध्ये अडकले .

बीड दि.9 जुलै – बीड जिल्ह्यातील 39 भाविक अमरनाथमध्ये अडकले आहेत. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील 38 आणि सांगवी पाटण येथील 1 असे एकूण 39 भाविक दि. 5 जुलै रोजी अमरनाथ यात्रेला गेले होते. अमरनाथ गुहेजवळ अचानक ढगफुटी (Cloudburst) होऊन पूरग्रस्तस्थिती निर्माण झाल्याने यात्रेसाठी गेलेले बाबा बर्फाणी यांच्या गुहेजवळ 11 भाविक अडकले असून त्यातील 28 भाविक हे खाली असलेल्या बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप आहेत.

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून 39 भाविक भक्त अमरनाथ यात्रेसाठी बर्फाणी बाबा यांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यातील 28 भाविक भक्त बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप असून त्यातील 11 जण हे वरतीच अडकले होते. अडकलेल्या 11 जणांशी संपर्क झाला असून अडकलेल्याना भारतीय सैनिकांच्या एनडीआरएफ (NDRF rescue Team) जवानांच्या मदतीने सुरक्षित स्थळी आणण्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने खाली बालटल या ठिकाणी आणण्यात येणार आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ आ.सुरेश धस, यांनी अडकलेल्या भाविकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून धीर देत काही मदत लागल्यास तात्काळ संपर्क करावा असे सांगितले आहे. बालटल येथे असलेल्या काका पोकळे या भाविकाशी पत्रकार प्रविण पोकळे यांनी संपर्क केला असता, आम्ही बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप पोहचलो आहोत मात्र आमच्यापैकी 11 जण मागे राहिले होते. आम्ही सर्व दर्शन करून परतीला निघालो असता अर्ध्या तासाने गुहेजवळ अचानक ढगफुटी (Cloudburst) झाली. त्यात आमच्या सोबत असलेले वयोवृद्ध आणि काही जास्त वजनाचे असल्याने थांबत थांबत चालत असल्याने ते मागे राहिले होते. यांच्यात आणि आमच्या मध्ये 2 ते 3 किलोमीटरचे अंतर होते. त्याचवेळी ढगफुटी झाली आणि ती 11 जणांनी समोर पाहिली. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून आम्ही सर्व सुखरूप आहोत.

11 पैकी 9 जण बालटल येथे हेलिकॉप्टरने (helicopter) आले असून 2 जण हेलिपॅडवर हेलिकॉप्टरच्या प्रतीक्षेत रांगेत थांबले आहेत. राहिलेल्या 2 जणाबरोबर आमचा सारखा संपर्क चालू असून ते थोड्याच वेळात आमच्या जवळ येतील. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील देवळाली येथील 50 भाविक देखील बालटल येथे आमच्या जवळ तंबूत सुखरूप असल्याची माहिती दिली. अडकलेल्या 11 भाविकात संतोष मरकड, सूरज वाडेकर, भाऊसाहेब पोकळे, भरत चौधरी, बापू शिंदे, छाया शिंदे, प्रयागा पोकळे, मनिराम खोजा, अशोक मंडा, किरण थोरवे, उषा पोकळे यांचा समावेश आहे.
( 39 devotees from Beed district stranded in Amarnath. )

Exit mobile version