जामखेड: दि.८(प्रतिनिधी) कार्यक्रमात पत्रकारांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा गावाचे माजी सरपंच भास्करराव पेरे (Bhaskar Pere) यांच्या वर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जामखेड येथील मोहा गावात 31 जानेवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त भास्करराव पेरे (Bhaskar Pere) यांना बोलवण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात पेरे यांनी पत्रकारांबद्दल अपशब्द काढले होते. त्यावरून पत्रकार चांगलेच आक्रमक झाले होते. पत्रकारांनी या संदर्भात तहसीलदार तसेच पोलीस (Police) निरीक्षक यांना निवेदनही दिले होते. या प्रकरणावर कारवाई करत जामखेड पोलीस (Police) ठाण्यात जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. भास्कर पेरे यांनी यापूर्वीही बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर येथे पत्रकार संघाच्या दर्पण दिनाच्या कार्यक्रमातही पत्रकारांविषयी नाराजी व्यक्त केली होती. पाटोदा येथे त्यांच्या मुलीच्या पराभवानंतर वृत्तपत्रांसह सोशल माध्यमातून पेरे यांच्यावर अनेकदा पेरेंच्या पराभवाबाबत लिखाण करण्यात आले होते.