BEED24

धारुर तालुक्यातील देवदूत हरवला; माजलगाव जलाशयात बचाव पथकाकडून शोध सुरु.

किल्लेधारूर दि.18 सप्टेंबर – धारुर तालुक्यातील तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना जीवदान देणारे डॉ. दत्तात्रय फपाळ यांचे आज माजलगाव धरणात (Majalgoan Dam) पोहत असताना बुडाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच समाज माध्यमातून पंचक्रोशितील देवदूत हरवल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
( Angel of Dharur Taluk lost; Rescue team starts search in Majalgaon Reservoir. )

मिळालेल्या माहितीनूसार तेलगाव (ता.धारुर) येथील डॉ. दत्ता फपाळ (वय 40) यांचा दररोज माजलगाव धरणात पोहण्याचा नित्यक्रम होता. आज दि.18 रविवारीही ते धरणावर पोहोण्यासाठी गेले होते. मात्र पोहत असताना ते पाण्यात दूरवर गेले परंतू परत येत असतानाच त्यांना काळाने गाठले. सिंदफणा जलाशयात त्यांना जलसमाधी झाली. अतिशय प्रेमळ स्वभावाचे सतत चेहऱ्यावर स्मित हास्य असणारे, कमी बोलणारे व तेलगाव परिसरामध्ये कोरोना काळात सर्वांचा चालता बोलता देव ठरलेले अतिशय हुशार म्हणून ते लोकप्रिय होते.

अजिंक्य हॉस्पिटलची शान गेली
तेलगाव परिसरात त्यांचे अंजिक्य हॉस्पिटल होते. डॉ.फपाळ यांच्या अकाली निधनाने अजिंक्य हॉस्पिटलची शान गेली व तेलगाव पोरका झाला अशी प्रतिक्रिया येत आहे. माजलगाव, धारूर आणि वडवणी (Majalgoan, Dharur and Wadvani) तालुक्यात त्यांची गुणी डॉक्टर म्हणून ओळख होती. त्यांच्या पाण्यात बुडाल्याच्या वृत्तानंतर सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात श्रध्दांजली व्यक्त करत हळहळ व्यक्त केली जात आहे. माजलगाव जलाशयात त्यांच्या पार्थिवाचा बचाव पथकाकडून (Rescue team) शोध सुरु आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. घटनास्थळी पोलिस व महसूल कर्मचारी तळ ठोकून आहेत. शोधकार्यासाठी एनडीआरएफ (NDRF) पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याचे कळते.

Exit mobile version