केज दि.1 मे – लॉकडाऊन (lockdown) असतानाही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केजमध्ये अँटिजेन टेस्ट (Antigen Test) चा पर्याय अवलंबला गेल्याचे आज दिसुन आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदरील मोहीम सुरू केली असून यामध्ये अनेकांची टेस्ट करण्यात येत आहे. हा प्रयोग धारुर शहरातही राबवला जाणार असल्याचे सपोनि सुरेखा धस यांनी सांगितले.
(Antigen tests begin for unruly commuters in Kaij City; Roads fall dew, It will also happen in Dharur.)
दोन दिवसांपुर्वीच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यासंदर्भात आदेश काढून कठोर अमंलबजावणीचे संकेत दिले होते. विकेंड लॉकडाऊनच्या (lockdown) पार्श्वभूमीवर काल तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी शनिवारी आणि रविवारी विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन केले होते. मात्र ऐकतील ते लोक कसले ? आज सकाळ पासूनच लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर आले होते. मात्र अगोदरच तयारीत असलेल्या प्रशासनाने विनाकारण जे बाहेर येतील त्यांची टेस्ट आणि दंड करायला सुरुवात केली.
या कारवाईसाठी महसूल, पालिका, आरोग्य व पोलिस प्रशासनाने संयुक्त प्रयत्न केले. यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, डॉ.दत्तात्रय चाटे यांच्यासह पोलीस कर्मचारी महादेव गुजर, शेख तसेच नगरपंचायत ची टीम कार्यरत आहे. सदरील मोहिमेमुळे कांही वेळात रस्ता ओस पडत असल्याचे चित्र दिसून आले.
केज पाठोपाठ धारुरमध्येही ॲन्टीजन करणार-धस
आज केज शहरात रस्त्यावर मोकार फिरणाऱ्या लोकांवर थेट ॲन्टीजन तपासणी (Antigen Test) करण्याची कारवाई करण्यात आली. अशाच स्वरुपाची कारवाई धारुर (Dharur) शहरात करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली. आज विकेंड कडक बंदसाठी धस यांनी शहरातील विनाकारण फिरणाऱ्यासह पालेभाज्या विक्रेत्यांना तंबी दिली.