मुंबई : दि.२४- राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून सोमवारच्या तुलनेत काल दि.२३ फेब्रुवारी रोजी १००० नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ६२१८ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर ५८६९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत.
(Anxiety has increased … again the number of patients has increased, see which districts are most at risk …)
सोमवारी राज्यात ५ हजार २१० नवीन कोरोनाबाधित (Corona positive) आढळले होते तर १८ जणांचा मृत्यू झाला. रविवार पेक्षा ही संख्या कमी असल्याने दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी पुन्हा यात वाढ होवून दिवसभरात कोरोनाचे ६२१८ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर ५८६९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात ५१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.४५ टक्क्यांवर आहे. अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ लाख १२ हजार ३१२ वर पोहोचला आहे.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या प्रमुख पाच जिल्ह्यांत काेराेनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्के आहे. त्यामुळे तेथील चिंता आणखी वाढली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशाच्या तुलनेत मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग दिसून येत होता. सध्या मुंबईत २२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३ लाख १९ हजार ८८८ कोरोनाबाधित (Corona positive) असून बळींचा आकडा ११ हजार ४४६ आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ हजार ३९७ आहे.
विदर्भात मागील पाच दिवसांत दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. या ठिकाणी मृत्युदर २.४१ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९ टक्के इतके आहे. विदर्भातील स्थानिक प्रशासन संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करीत आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, ठाणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यवतमाळ आणि अकोल्यातही काही अंशी रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या राज्यात पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९३९९ एवढी आहे. तर मुंबई, ठाण्यात अनुक्रमे ६११९ आणि ६१७७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. अमरावतीमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५५९५ एवढी आहे. तर नागपुरात सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा ६८३२ वर पोहोचला आहे.