मुंबई दि.22 मे – नुकताच केंद्र सरकारने मुल्यवर्धीत कर कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले असून आज राज्य सरकारनेही सामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयानंतर पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात होणार आहे.
शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. केंद्राने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती.
यानंतर आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेत असल्याचे बोललं जात आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. यामुळे केंद्र व राज्याचे मिळून पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.
राज्यात असे असतील नवे दर
व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. याशिवाय सरकारने डिझेलवर 1 रुपये 44 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे. केंद्र सरकारनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
( Big news … State government relieves common people after Center; Petrol, diesel even cheaper. )