बीड दि.23 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) शहरात दुचाकीची समोरासमोर धडक होवून तर केज (Kaij) शहरात दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) होवून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे.
( Both killed in horrific accident; Incidents in Beed district. )
गेवराई शहरात जुन्या बसस्थानकासमोर दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. अविनाश उर्फ बदाम गंगाधर जोंधळे (वय-19, रा.ताकडगाव) असे त्याचे नाव आहे.
या घटनेसंबंधी सविस्तर माहिती अशी की, 21 फेब्रुवारी राेजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील जुन्या बसस्थानकासमोर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. अविनाश उर्फ बदाम जोंधळे गंभीररित्या जखमी झाला. नागरिकांनी त्याला तातडीने गेवराई रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले. बीडला जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
केजजवळ अपघात, एक जण जागीच ठार
केज अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालयासमोर एका दुचाकीस्वाराला टेम्पो ने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर सदरील इसमास उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु जागीच मृत्यू झालेला होता.
या बाबतची माहिती अशी की दि.22 फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री 9.30 वाजता केज-अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय केज पासून सुमारे 200 मिटर अंतरावर तांबवेश्वर फर्निचर या दुकाना समोर अंबाजोगाई कडून बीडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो क्र. (एम एच23/ए यु-2290) आणि केज कडून अंबाजोगाईच्या दिशेने जाणाऱ्या मोटार सायकल क्र. (एम एच-44/आर-1774) या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. अपघातात मोटार सायकलस्वार संतराम वय (45 वर्ष) कावळे, रा. परळी याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती केज पोलिसांना (Police) मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक उमेश आघाव, मंगेश भोले, अशोक गवळी, हनुमंत गायकवाड हे अपघाताच्या घटनास्थळी हजर झाले. या नंतर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविण्यात आले.