BEED24

दिवसा केजमध्ये तर रात्री युसूफवडगांव मध्ये घरफोड्या;

केज दि.११(प्रतिनिधी) काल दि.१० रोजी केज शहरात कामगार नगरमध्ये एका खानावळ चालकाचे दिवसाढवळ्या घर फोडल्याची तर केज तालुक्यातील युसूफवडगांव पोलीस ठाण्यापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हात साफ करून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज व युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज शहरात कळंब रस्त्यालगत असलेल्या कामगार नगर मधील पोपट नवनाथ मुळे यांचे घर फोडून साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची चैन मिळून एक लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज भरदुपारी चोरीची घटना घडली. याबाबत केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तर आज युसुफ वडगाव येथील आशोक दामोदर चौधरी यांचे घर पोलीस ठाण्यापासून १०० ते १५० मीटर अंतरावर आहे. याच ठिकाणी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून किचन रूमचे कुलूप तोडून घरातील कपाटातील रोख ३५ हजार रूपये लंपास केले. याबाबत रेखा अशोक चोधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरूद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गावात दुसरी चोरीची घटना उघड झाली. चोरट्यांनी बंद खोलीचे कुलूप तोडुन त्यामधील सोयाबीनचे ८/९ कट्टे चोरून नेले आहेत तर एका ठिकाणी कुलुप तोडुन घरात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना घरातील सदस्यला जाग आली असता चोरट्यांनी तेथुन पळ काढला. गावात गेल्या २/३ दिवसांपासुन चोरट्यांचा वावर वाढला असुन यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात पोलीस ठाणे असतानाही चोऱ्याचे प्रमाण वाढत आहेत. गावात होणाऱ्या चोरीस आळा घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version