BEED24

झपाट्याने वाढतोय धारुरचा आकडा; आज गंभीर परिस्थिती.

किल्लेधारूर दि.30 एप्रिल – माजलगाव मतदारसंघात किल्लेधारूर तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर आहे. आज शहरातील 260 क्षमतेची तिन्ही कोविड केअर सेंटर (Covid care center) भरली असून 309 कोरोना बाधित (Corona Positive) उपचारासाठी दाखल आहेत. यामुळे स्थानिक प्रशासन हतबल झाले असून तालुक्यातील कांदेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेत नवीन कोविड सेंटर सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

(Dharur’s number is increasing rapidly; Serious situation today.)

मतदारसंघात सर्वाधिक कोरोना बाधित (Corona Positive) धारुर तालुक्यात आढळत आहेत. छोटा तालुका असताना मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात संसर्ग वाढला आहे. बहुतांश डोंगराळ भाग असलेल्या या तालुक्यातील अनेक ओस पडलेली गावे सध्या उसतोड मजूर परतल्यामुळे गजबजली आहेत. शासनाने प्रतिबंध लावलेले असताना ग्रामीण भागात याचा कसलाही परिणाम दिसून येत नाही. स्थलांतरीत मजूर परतला असल्याने बाधितांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे.

धारुर तालुक्यात दुसऱ्या लाटेत सुरुवातीला 40 खाटांचे कोविड केअर सेंटर (Covid care center) मंजूर करण्यात आले. यात वाढ करुन पुन्हा 100 खाटां परवानगी मिळाली. परंतू दिवसेंदिवस संख्या वाढतच असल्यामुळे येथील दुसरे 60 खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले. हे सुध्दा अपुरे पडत असल्याने गेल्याच आठवड्यात नवीन 100 खाटांचे कोविड सेंटर मंजूर झाले. तालुक्यासाठी सध्या 260 क्षमता असलेले तीन कोविड केअर सेंटर सुरु आहेत.

मात्र, वाढलेली रुग्ण संख्या सध्या यंत्रणेवर ताण आणत आहे. सध्या तालुक्यात 309 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. 260 ची क्षमता असताना 309 रुग्ण शुक्रवार सकाळपर्यंत दाखल होती. यामुळे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी तालुक्यातील कांदेवाडी येथे असलेले आदिवासी विकास विभागाचे वस्तिगृह ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दररोज वाढणारी रुग्ण संख्या सध्या प्रशासनाची डोकेदूखी ठरत आहे. सध्या धारुर तालुक्यात 568 ॲक्टीव रुग्ण आहेत. आजपर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या 2071 तर मृतांची संख्या 36 आहे.

सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची व्यवस्था गाव पातळीवर शाळेत करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगितले. तर पात्र असणाऱ्या सौम्य लक्षणे व लक्षणे आढळून न येणाऱ्या बाधितांना गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढणारी संख्या प्रशासनासमोर अनेक आवाहन उभी करत आहेत. धारुर तालुक्याच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणून शहरात स्पर्श हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर मंजूर झाल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची अॉक्सिजन व वेंटिलेटरची गरज पुर्ण होणार आहे.

Exit mobile version