मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. कोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोलापूर, पुणे, सांगली, औरंगाबाद, लातुरसह अनेक जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमध्ये काही जणांना जीव देखील गमावावा लागला आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी लोक वाहून देखील गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या कोकण किनारपट्टी व मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला असुन पुणे व मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. दिशा बदलून वादळ अरबी समुद्राकडे मार्गस्थ झालेले असले तरी पुढच्या दोन दिवसासाठी राज्यात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
पंढरपुरात भिंत कोसळून सहा मृत्यूमुखी डले आहेत. काल दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. सावळेश्वर, ता. मोहोळ येथील शंकर देवकर यांच्यासह 4 जण पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील एक वृद्ध व्यक्ती नागझरी नदीत वाहून गेले आहेत. परिते, ता. माढा येथील एक व्यक्ती पाण्यात वाहून गेली तर निमगाव, ता.माढा येथे एक कारसह तीन व्यक्ती वाहून गेल्याचे समोर येत आहे. बार्शी तालुक्यातील मालेगाव येथील एका 11 वर्षीय मुलाचा वीजेचा धक्का लागून मृ्त्यू झाला. राज्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, यवतमाळ, गोंदीया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाने मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकणातील भातशेती व बीड जिल्ह्यातही कापसासह राज्यात हाताला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर उस्मानाबाद व बीड जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मांजरा प्रकल्पाचे जलस्तर वाढले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव जलाशयाचे अकरा दरवाजे वर घेण्यात येवून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.