मुंबई दि.24 जुलै – महाराष्ट्रात बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) राज्यातील अनेक जिल्ह्यांत जलप्रलयसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यभरात हाहाकार माजला असून तब्बल 75 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे, तर 100 पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरड कोसळल्यामुळे मनूष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असून मराठवाड्यात (Marathwada) पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
(Floods in Maharashtra … more than 75 killed, 100 missing; Red alert again.)
अनेक ठिकाणी दरड, घरे कोसळल्यामुळे अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहे, तर नदी आणि ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्यामुळे अनेक जण बेपत्ता आहेत. या यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. हवामान खात्याने पुन्हा मुंबई आणि कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ (Red alert) घोषित केला आहे.
महाडमध्ये दरड कोसळून 38 ठार
चिपळूण पाठोपाठ रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये (Mahad) गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाचे रौद्ररुप दिसून आले़ महाडमधील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बळींचा आकडा 38 वर पोहोचला आहे़ अनेकजण जमिनीखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखालून 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 80 ते 85 जण त्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. या दरडीखाली 30 ते 35 घरे दाबले गेलीत.
साताऱ्यात 12 जणांचा मृत्यू
साताऱ्यातील (Satara) आंबेघर गावात दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले आहेत़ किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. ग्रामस्थांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. मोरणा विभागात येणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली.
तीन कुटुंबातील सदस्य रात्रीपासून बेपत्ता आहेत़ एनडीआरएफचे (NDRF) एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांमार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. वाई तालुक्यातील कोंढावळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेली असून त्यात दोघांचा मृत्यू झाला़ ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
चिपळूमध्ये 11 कोरोनाबाधितांचा बळी
चिपळूण शहरातील अपरांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 21 कोरोना बाधित (Corona positive) रुग्णांपैकी 11 रुग्णांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. हे 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 24 तासापेक्षा अधिक काळ हे हॉस्पिटल पाण्यात राहिल्याने ही जिवीतहानी झाली आहे. पुराने शहराला विळखा घातल्यानंतर या रुग्णालयाचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने मात्र याबाबत अद्याप अिधकृत माहिती दिली नसून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
पोलादपूरात भूस्खलन, 11 मृत्यूमुखी
पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री भूस्खलन (Land sliding) होऊन 11 जणांचा मृत्यू झाला़ तर 13 जणांवर उपचार सुरू आहे़ केवनाळे येथील 6 जणांचा तर गोवेले सुतारवाडी येथे 5 जणांचा मृत्यू झाला़ दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली आहेत.
गोवंडीत इमारत कोसळून चौघांचा मृत्यू
गोवंडी शिवाजी नगर येथील प्लॉट क्रमांक 3 मधील एकमजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन, राजावाडी या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पहाटे ही इमारत कोसळली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली शेख व कुरेशी कुटुंबीय अडकल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. पोलिस (Police), अग्निशमन दल (Fire brigade) आणि पालिका कर्मचाऱ्यांची मदत येण्यापूर्वीच स्थानिकांनी आपल्यापरीने बचावकार्य सुरू केले. 11 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्या खालून काढले आणि त्यांना राजावाडी, सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मृतकांच्या वारसांना पाच लाखाची मदत
राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पीएम रिलीफ फंडमधून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारकडून जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहे.