किल्लेधारुर दि.27 अॉगस्ट – Heavy Rain Dharur जोरदार अतिवृष्टीत तालुक्यातील अंजनडोह येथील नितीन शिवाजीराव कांबळे (वय 42 वर्षे) रुईधारुरहून अंजनडोहकडे चारचाकी वाहनातून जात असताना वाण नदीवरील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाडीसह वाहून गेले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असून वाण नदीला पुर आले आहे. वाण नदीवरील तांदळवाडी धरण भरुन वाहत असुन आवरगाव व अंजनडोह पुल पाण्याखाली गेले आहे. बुधवारी रात्री रुईधारुरहुन अंजनडोहकडे धारुर येथील आडत व्यापारी नितिन शिवाजीराव कांबळे (वय 42) हे आपल्या टाटा कंपनीच्या झेस्ट चारचाकी वाहनाने जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहनासह वाहुन गेले. गावकरी, महसुल प्रशासन व पोलिसांनी रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुलापासुन जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बांधाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. प्रशासनाने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धारुर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.
आवरगाव पुलावर रिक्षा वाहुन गेला.
दरम्यान आवरगाव येथेही वाण नदीला पुर आल्यामुळे अंबाजोगाईचा संपर्क तुटला आहे. रात्री उशिरा आवरगावच्या पुलावरुनही तीन चाकी रिक्षा वाहुन गेल्याचे वृत्त समोर आले आहे. धारूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नदी, नाला, ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोक्याची नाही याची खात्री करूनच पार करावा असे आवाहन किल्ले धारूरचे तहसीलदार श्रीकांत निळे यांनी केले आहे.
