किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) येथील अजीजपुरा भागात राहणाऱ्या एका दाम्पंत्याचे निधन झाल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे. पत्नीचे निधन (Death) झाल्याचे कळताच पतीनेही प्राण सोडल्याची ही हृदयद्रावक घटना आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर (Dharur) शहरातील शेख रहिम शेख लाल यांच्या पत्नी हसीना (५४) यांना उपचारासाठी लातूर येथील खाजगी दवाखान्यात चार दिवसांपुर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचार सुरु असताना काल दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले पती शेख रहिम (५८) यांना पत्नीचे निधन झाल्याचे कळताच तीव्र हृदयविकाराचा (Heart attack) धक्का आला. या धक्क्यात त्यांची तत्क्षणी प्राणज्योत मावळली. शेख रहिम हे शहरातील नामांकित व्यापारी होते. मितभाषी स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. पत्नीवर नितांत प्रेम असणाऱ्या रहिम यांना पत्नी निधनाचे वृत्त सहन न झाल्याने हृदयविकाराचा (Heart attack) धक्का आला. यातच त्यांचे निधन (Death) झाले. शहरात प्रथमच अशी हृदयद्रावक घटना घडली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दि.१६ शनिवारी सकाळी ११.३० वाजता मयत दाम्पंत्यावर धारुर (Dharur) शहरातील तहसील कार्यालयासमोरील तकीया तलाव परिसरातील कब्रस्तानमध्ये शेकडोंच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला.