BEED24

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होवू शकतो लॉकडाऊन; बीडमध्ये झाला हा निर्णय

बीड दि.23 मार्च- राज्यात 1 ते 22 मार्च या काळात तब्बल तीन लाख 43 हजार नवीन रुग्ण वाढली आहेत. तर याच काळात राज्यभरात तेराशे रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वाधिक रुग्णवाढ आणि मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांचा लॉकडाऊन (lockdown) होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या (Corona virus) संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात होत असलेल्या रुग्ण वाढीनंतर पुढील आदेशापर्यंत खानावळ, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, चहा स्टॉल, पान टपरी संपुर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात कोविड नियमांचे पालन करत पार्सलची सुट देण्यात आली आहे.

(Lockdown may occur in this district of Maharashtra; The decision was made in Beed)

दुकानदार, हॉटेल, बिअरबार चालकांनी सध्या घातलेल्या निर्बंधानुसार वाटचाल सुरु ठेवल्यास आणि नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास लॉकडाऊनची गरज भासणार नाही. मात्र, नियमांचे पालन सर्रास होत नसल्याचे दिसत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी कोरोना विषाणूची (Corona virus) साखळी खंडीत होणे गरजेचे आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्य शासन मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांमध्ये 15 ते 65 हजारांपर्यंत रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे नगर, जालना, नांदेड, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही पाच ते दहा हजारांपर्यंत रुग्ण वाढले आहेत. गोंदिया, वाशिम, हिंगोली व सिंधुदूर्ग वगळता सर्वच जिल्ह्यांमधील मृतांची संख्या दोनशेहून अधिक आहे. यातच मार्चमध्ये (1 ते 22 मार्च) तीन लाख 43 हजार रुग्ण वाढले तर तेराशे जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

1 मार्च रोजी ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 77 हजार 618 होती ती वाढून एक लाख 40 हजार झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णवाढीचा (Corona Positive) आलेख मोठा आहे. अन्य आठ जिल्ह्यांमध्येही दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह वाढत असल्याचे दिसुन येत आहे. मागिल 22 दिवसांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 65 हजार रुग्ण वाढले आहेत. मुंबईच्या तुलनेत नागपूरची संख्या अधिक आहे. मार्चमध्ये नागपुरात 47 हजार 559 रुग्णांची वाढ झाली आहे. कालच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचा (lockdown) इशारा दिला.

सर्वाधिक कोरोना रुग्ण (Corona Positive) आणि मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांमध्येच काही दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय वाढलेले रुग्ण (1 ते 22 मार्च) पुढील प्रमाणे आहे.

मुंबई (39165), ठाणे (27,454), पुणे (64,772), नाशिक (23,473), जळगाव (15,192), औरंगाबाद (17,656), नागपूर (47,559), वर्धा (5,463), बुलडाणा (6,866), अकोला (8,797), अमरावती (9,844), नांदेड (8,849), नगर (9,175), यवतमाळ (6,734) या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर (2,184), भंडारा (1,476), वाशिम (4,094), उस्मानाबाद (1,327), हिंगोली (1,219), परभणी (2,403), लातूर (3,142), बीड (3,803), धुळे (4,494), नंदूरबार (3,994), सोलापूर (3,970), कोल्हापूर (840), सांगली (1,336), सातारा (3,431), रायगड (4,968) आणि पालघर (2,055) अशाप्रकारची रुग्णवाढ झाली आहे.

Exit mobile version