पुणे दि. 1 मे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेतही याबाबतचा उल्लेख करत 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला. यानंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविल्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या महिनाभरापुर्वी गुढी पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. याचाच पुनर्उच्चार औरंगाबादच्या सभेत केला. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे (loudspeaker) उतरविण्यावर बोलताना प्रसंगी मंदिरावरचे भोंगे काढले तरी चालतील पण आधी मशिदीवरचे काढा असा इशारा दिला. यानंतर मात्र आता त्यांच्या अल्टिमेटमवर उघड प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून मशिदीवरील भोंगे काढणे म्हणजे हिंदू धार्मिक स्थळासह इतर सणावर संकट ओढावून घेण्यासारखे असल्याची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची प्रतिक्रिया…
राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या भूमिकेवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदींवरील भोंगे उतविल्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होईल, अशी स्पष्ट भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. आनंद दवे यांनी बोलताना, “भोंगे उतरवणे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात देखील शक्य झाले नव्हते. भोंगे उतरविण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचं होईल.
आमची भूमिका 3 तारखेला अहमदनगरच्या मेळाव्यात मांडू. प्रत्येक गावाची जत्रा, ग्राम दैवत यात्रा, गणपतीचे मिरवणूक सहित 12 दिवस, नवरात्रीचे 10, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, त्यांच्या यात्रा, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळंच संकटात येईल”, अशी भूमिका आनंद दवे यांनी मांडली. “रस्त्यावर नमाज पठण चूकीचेच आहे पण मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवात होणाऱ्या आरत्या, त्यापण रस्त्यावरच होत असतात. मिरवणूक, दांडिया यांच काय करणार? स्पिकर खाली आलेच पाहिजेत, तर मग हिंदू उत्सवातले स्पिकर काय करणार?”, असे प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया…
राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या इशाऱ्यानंतर राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील यांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यात भोंग्याचा विषय महत्वाचा नाही, सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय? असा परखड सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी औरंगाबादमधील सभेवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
‘राज्यात भोंग्यावरुन राजकारण केलं जातं आहे. भोंगा महत्वाचा नाही मात्र फक्त भोंग्यावरुन हिंन्दु मुस्लिम यांच्यामध्ये राज्यात वाद वाढण्याचा प्रयत्न होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय होईल, असा प्रश्न वळसे पाटील यांनी उपस्थित केला. ‘आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्याच अंगावर येणार आहे. अरे… बाबा.. हनुमान चालीसा हिंदीत आहे वाचायचीच असेल तर हनुमान स्त्रोत्र वाचा. असा खोचक टोलाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला.
( Most damage to Hindutva due to lowering of sloudspeaker on mosques; Reactions are coming after Raj Thackeray’s ultimatum. )