BEED24

६ वर्षीय बालिकेच्या मृत्यूनंतर आली महावितरणला जाग…

परळी: दि.१०(प्रतिनिधी) परळी (Parli) येथील शिवनगर भागात मंगळवारी विजेचा शॉक लागून एका मुलीचा मृत्यू झाला. या भागातील सहा वर्षाची चिमुकली गौरी वैजनाथ घोटकर मंगळवारी खेळत असताना तिचा त्या खांबाला स्पर्श झाला आणि खांबाला चिकटून तिला जबरदस्त शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला. चिमुकलीचा जीव गेल्यांनतरच वीज कंपनीला जाग आली आणि दोनच तासांत बिघाड शोधुन दुरुस्ती करण्यात आली.

परळी (Parli) शहरात वडार कॉलनीच्या मागे शिवनगर येथे महावितरण (Mahavitran) चे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या मागील बाजुस विजेच्या खांबात मागील दोन महिन्यांपासुन विद्युत प्रवाह उतरला होता. या विषयी परिसरातील अनेक नागरिकांनी अनेकदा तक्रार केली पण महावितरणने याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. दि.९ मंगळवार रोजी याच खांबाला स्पर्श झाल्याने चिमुकलीला जीव गमवावा लागला. परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर संतप्त नातेवाइकांनी बालिकेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सतंप्त नागरिक व नातेवाइक थेट संभाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात एकत्र आले. त्यांनी बालिकेच्या मृत्यूप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत आंबेडकर यांनी सांगीतले. रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबात मागील दोन महिन्यांपासून वीज प्रवाह उतरत होता. या खांबाजवळून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांना किरकोळ वीजेचा शॉक बसले. त्यामुळे नागरिक वीज वितरण कंपनीच्या (Mahavitran) कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व या भागातील लाइनमनला सांगत होते. परंतु, कोणतीच दुरुस्ती होत नव्हती. वेळीच दुरुस्ती केली असती तर मात्र बालिकेचा जीव वाचला असता. याबाबतीत पोलिसांनी (Police) सदोष मनुष्य वधाचा गुन्हा संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यावर नोंदवावा अशी मागणी होत आहे.

Exit mobile version