बीड दि.2 मे – Murder in Beed दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने पोटच्या मुलाने वृद्ध आईचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे तर परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे दारुसाठी पैसे दिले नसल्याने पुतण्याने चुलतीचा खुन केल्याचे उघडकीस आले आहे. सदर घटनांमुळे बीड जिल्हा हादरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील मौजे येल्डा येथे रात्री बारा वाजेच्या दरम्यान पोटच्या मुलाने आईचा खुन केल्याची घटना घडली. मृत महिलेचे नाव चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय अंदाजे 72 वर्षे) असून याप्रकरणी आरोपी अमृत भानुदास सोन्नर यास अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मौजे येल्डा येथील चोत्राबाई भानुदास सोन्नर या आपल्या मुलगा, सून नातवंडासह मौजे एल्डा येथे राहत होत्या. त्यांचा मुलगा अमृत (वय 45) यास दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे त्याचे कुटुंबीय वैतागले होते. काही दिवसांपूर्वीच अमृतची पत्नी व मुलं भांडणाला कंटाळून माहेरी गेल्याचे कळते. त्यामुळे घरी आई व मुलगा दोघेच असून रात्री बारा वाजताच्या दरम्यान अमृतने आईला दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून हुज्जत घातली. आईने त्याला पैसे दिले नाहीत म्हणून चिडून जाऊन जवळचे दगड गोटे उचलून आईच्या अंगावर टाकून दगडाने ठेचून मारहाण करू लागला यातच प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुसरी घटना परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथील आहे. या खूनाच्या घटनेने परळी पुन्हा हादरली आहे. दारूसाठी पैसे देत नसल्यामुळे पुतण्याने रागाच्या भरात घरातील कुर्हाडीने चुलतीचा जीव घेतला. डोक्यावर आणि अंगावर कुर्हाडीने सपासप वार करुन चुलतीची हत्या केली. सदर घटना दि.1 मे रोजी सांयकाळी 6 वाजता घडली असून खुन केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. परिमाला बाबुराव कावळे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव चंद्रकांत धुराजी कावळे (वय 25) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. एका घटनेत मुलाने सख्ख्या आईला तर दुसऱ्या घटनेत पुतण्याने चुलतीला केवळ दारुसाठी पैसे न दिल्याने ठार केले. या घटनांमुळे बीड जिल्हा हादरला असून ग्रामीण भागात सर्रास होणारी दारु विक्रीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.