BEED24

केजच्या ‘त्या’ अपहृत व्यक्तीच्या खूनाने बीड जिल्ह्यात खळबळ; धारुर व वडवणीचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

बीड दि.16 मार्च – बीड (Beed) जिल्ह्यातील लव्हरी (ता. केज) येथील अपहरण झालेल्या खासगी साखर कारखान्यातील लेबर ऑफिसर सुधाकर चाळक यांचा खून (Murder) झाल्याचे उघडकीस आले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

( Sensation in Beed district over the murder of Kaij’s kidnapped man; Dharur and Vadvani accused in police custody. )

काही दिवसांपुर्वी पैशाच्या देवाणघेवाण वरुन केज (Kaij) तालुक्यातील सुधाकर चाळक यांचे अपहरण बीड जिल्ह्यातून झाले होते. त्यानंतर संशयितांनी अपहृताचा खून भुदरगड तालुक्यात केला, तर शीर गडहिंग्लज तालुक्यात टाकल्याचे तपासात समोर आले आहे. केज पोलिसांनी (Police) मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी निलजी (ता. गडहिंग्लज) येथील नदीपात्रात शिर शोधले मात्र ते सापडू शकले नाही.

केज पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक (PSI) राजेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन मुख्य संशयित दत्तात्रय देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड) याने तुकाराम मुंडे (रा. चारदरी, ता. धारूर Dharur ) व रमेश मुंडे (रा. कोठरबन, ता. वडवणी) यांच्या मदतीने चाळक यांचे बारा लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून अपहरण केले. त्यासाठी मुंडे यांनी 25 हजार रुपये देऊ केले.

असे घडले कांड…
चाळक यांना भुदरगड तालुक्यातील जंगलात डांबून अमानूष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चाळक यांचा मृत्यू झाला. यामुळे संशयिताने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने चाळक यांचा मृतदेह महाशिवरात्रीच्या रात्री गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील पुलावर नेला. मृतदेहाचे सर्व कपडे काढून सत्तूरने शीर धडावेगळे केले.

यानंतर नदीकाठावर त्याचे कपडे जाळून टाकण्यात आले. नायलॉन दोरीने मृतदेहाभोवती चार ते पाच दगड बांधून हिरण्यकेशी नदीत फेकून दिले. तोडलेले शीर पिशवीत घालून निलजी येथील पुलावरून नदीत फेकून दिले. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेला सत्तूर हेब्बाळ येथील ओढ्यात टाकण्यात आला. मंगळवारी घटनास्थळावर संशयित देसाई याला पोलिसांनी नेल्यावर त्याने घटनाक्रम कथन केला. नांगनूर पुलावर तपास अधिकारी राजेश पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला.

शिर शोधण्याचा प्रयत्न …
निलजी पुलावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या दहा जवानांनी शीर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र शीर शोधण्यात जवानांना अपयश आले. या प्रकरणात आणखी साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. गुन्ह्याच्या तपासात पोलिस नाईक अनिल मंदे, दिलीप गीते, संतोष गीते, अरुण पाटील, पोलिस पाटील सतीश काळापगोळ यांनी सहकार्य केले.

 

Exit mobile version