BEED24

धक्कादायक … ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू; एका मजूराला वाचवताना घडली दुर्घटना.

सोलापूर, 23 डिसेंबर – सोलापूरातील (Solapur) अक्कलकोट रोडवर एक दुर्घटना झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथे ड्रेनेज लाइनचे काम करीत असताना चेंबरमध्ये गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू झाला.

(Shocking … 4 workers suffocated to death in drainage chamber; An accident occurred while rescuing a laborer.)

सोलापुरातील अक्कलकोट रोडवर ही दुर्घटना (Accident) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेनेजचे काम सुरू असताना एक मजूर चेंबरमध्ये (drainage chamber) पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एकामागे एक असे एकूण सहा जण चेंबरमध्ये गेले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 2 जणं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ड्रेनेज लाईनच्या बाजूलाच रस्त्याचे ही काम सुरू आहे. पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) वैशाली कडूकर यांनी याबाबत माहिती दिली.

सोलापूर ते अक्‍कलकोट मार्गावर महानगरपालिकेच्या वतीने ‘अमृत’ योजनेतून ड्रेनेजलाईन टाकण्याचे तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून महामार्गाच्या (National Highway) रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सादूल पेट्रोल पंपासमोरील गांधीनगर ते कोंडानगर यादरम्यान ड्रेनेज लाईनच्या चेंबरचे काम सुरू होते.

त्यावेळी अचानक एका मजुराचा पाय घसरून तो साधारण 9 फूट खोल चेंबरमध्ये पडला. त्यामुळे आजूबाजूला काम करीत असलेले इतर मजूर हे त्या मजुराला वाचविण्यासाठी पळत आले. परंतु, चेंबरमध्ये पडलेल्या मजुराला वाचविण्याच्या नादात आणखी चार मजूर चेंबरमध्ये पडले.

यावेळी वरती असलेल्या मजुरांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी याठिकाणी गर्दी करून चेंबरमध्ये पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना (Police) समजल्यानंतर पोलिस निरीक्षक (Police Inspector) संजय पवार व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागरिकांच्या मदतीने चेंबरमध्ये पडलेल्या मजुरांना बाहेर काढले. परंतु त्यापैकी दोन कामगारांचा मृत्यू चेंबरमधील गॅसमुळे गुदमरुन झाल्याचे समोर आले. परंतु त्यानंतर काहीवेळाने आणखी एक कामगार ड्रेनेजमध्येच असल्याची माहिती इतर कामगारांनी दिली.

त्यानंतर पुन्हा तिसर्‍या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर इतर दोघा जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मृत व जखमींची नावे समजू शकलेली नव्हती. मृत व जखमी मजूर हे परराज्यांतील असून त्यांच्या भाषेमुळे त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

एमआयडीसी पोलिसांकडून (MIDC Police) तसेच महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांकडून ही दुर्घटना कशी झाली याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. यावेळी हे काम घेतलेला ठेकेदार मात्र गायब होता.

 

Exit mobile version