आष्टी दि.२१(प्रतिनिधी) दोन दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेनंतर येथील प्रभारी तहसीलदार शारदा दळवी यांनी वाळू माफिया विरुध्द दंड थोपटले असून वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी चक्क शासकीय वाहन टाळून दुचाकी वरुन गस्त सुरु केल्याचे दिसत आहे.
आष्टीचे (Ashti) तहसीलदार (Tahsildar) राजाभाऊ कदम हे रजेवर गेल्याने नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्या कडे तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला आहे. आष्टी (Ashti) तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याने यावर थेट कारवाईचे पाऊल उचलण्याचे धाडस त्यांनी प्रभार घेताच सुरु केले. अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई करताना दि.१६ रोजी वाळू माफियाकडून धक्काबुक्की व शिविगाळीचा प्रकार त्यांच्या समोरच घडला होता. यावर पोलिस (Police) ठाण्यात संबधितावर गुन्हा नोंदवण्यात आला. बरेचवेळा शासकीय वाहन पाहुन वाळू माफिया पोबारा करतात. यामुळे दळवी यांनी अधिक सतर्कता बाळगून वाळू माफियाच्या मुसक्या आवळण्यासाठी शासकीय वाहनाचा वापर टाळत थेट दुचाकीवरुन गस्त सुरु केली. यामुळे यापूर्वी केलेली पोलिस (Police) कारवाई व दुचाकी वरील गस्तीमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सर्वसामान्य नागरिकांतून पदभार घेतलेल्या महिला तहसीलदार (Tahsildar) शारदा दळवी यांनी चक्क कारवाई करण्यासाठी शासकीय गाडी शिवाय दुचाकी गाडीचा वापर केल्याने कौतुक होत आहे.