केजः दि.९ (प्रतिनिधी) बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) केज (Kaij) येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पडकले आहे. बीड (Beed) जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
दयानंद शेटे (वय ५०) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन घुले (वय ३१) असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे. सहाय्यकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून ५० हजार रुपये स्वीकारताना बीड (Beed) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. दोघा लाचखोराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे केजसह (Kaij) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.