बीड दि.23 मे – दुचाकीवर बसुन जात असताना मागे बसलेल्या एकाने दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीवर चाकुने सपासप वार करत हत्या केल्याची घटना मंझेरी ता.बीड येथील शांतीवन जवळ रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सदर खून बहिणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या रागातून झाल्याचे कळते.
ब्रम्हदेव हनुमान कदम (26, रा. मंझेरी ता.बीड) असे मयताचे नाव आहे. सिध्देश्वर उर्फ लक्ष्मण पांडुरंग बहिरवाळ (रा.मंझेरी ता.बीड) असे आरोपीचे नावे असून तो हत्या करुन फरार झाला आहे. ब्रम्हदेव कदम हा अविवाहित असून शेती करायचा. मित्र सिद्धेश्वरची बहीण नांदत नसून एकमेकांच्या घरी येणे- जाणे असल्याने तिचे व ब्रम्हदेवचे सूत जुळले. दोघांतील प्रेमप्रकरणाची भणक सिध्देश्वरला लागली होती.
असा काढला काटा….
दि.22 मे रविवार रोजी रात्री साडेनऊ वाजता ब्रम्हदेव हा समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ यांच्यासमवेत जेवणासाठी मंझेरी फाट्यावर गेला होता. दहा वाजता ब्रम्हदेव यास आरोपी सिध्देश्वर बहिरवाळ याने फोन करुन कुठे आहेस, असे विचारले. त्यावर त्याने धाब्यावर जेवण करत असल्याचे सांगितले.
काही मिनिटांनी सिध्देश्वर बहिरवाळ हा सदर धाब्यावर पोहोचला. त्यानंतर चौघे दोन दुचाकीवरुन गावी जाण्यास निघाले. समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ एका दुचाकीवर तर ब्रम्हदेव कदम व सिध्देश्वर बहिरवाळ दुसऱ्या दुचाकीवर होते. ब्रम्हदेव हा दुचाकी चालवित असताना शांतिवनजवळ पाठीमागे बसलेल्या सिध्देश्वर बहिरवाळने त्याच्या पोटात चाकूने सपासप वार केले.
पोटावर चाकूचे वार झाल्याने ब्रम्हदेवचा दुचाकीवरील ताबा सुटला व दोघेही खाली पडले. त्यानंतर समोरील दोघे परत आले तेव्हा सिध्देश्वर बहिरवाळच्या हातात चाकू व ब्रम्हदेवक कदम बेशुध्दावस्थेत पडलेला आढळून आला. यावेळी संबंधितांनी आरोपीस रोखण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीवरुन तो फरार झाला. त्यानंतर दोघांनी ब्रम्हदेवला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी ब्रम्हदेवला मयत घोषित केले.
दरम्यान, घटनास्थळी उपअधीक्षक (गृह) श्रीपाद परोपकारी, बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष साबळे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, पोलिस उपनिरीक्षक देवीदास आवारे, हवालदार पी.टी. चव्हाण, आनंद मस्के, पोलिस नाईक विजय जाधव, गणेश कांदे , अनिल घटमळ यांनी भेट दिली. आरोपी फरार असून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
( The bead shook again; Murder by stabbing a friend in the abdomen on a speeding bike. )