बीड दि.2 जून – बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मिरगाव येथे ही हृदयद्रावक घटना (Heartbreaking incident) घडली. कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आलं आहे. मृतांमध्ये आई व मुलीसह पुतणीचा समावेश आहे.
(Three drowned along with their mother who went to wash; Heartbreaking incident in Gevrai taluka.)
मृतांमध्ये रंजना गोडबोले (30), शीतल गोडबोले वय (10) व अर्चना गोडबोले वय (10) यांचा समावेश आहे. तर आरती गोडबोले या मुलीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी जावून गावकऱ्यांसह बचावकार्य केले. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
अशी घडली घटना…
रंजना गोडबोले या आपल्या मुलीसह दोन पुतणींना घेवून कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेल्या होत्या. सोबत लहान दहा वर्षांच्या दोन मुली असल्याने खोल पाण्यात न जाता, पाण्याचा अंदाज घेऊन कपडे धुणे सुरु होते. मात्र सोबत असलेली तिन्ही मुली पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्या. यात तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकीला वाचवण्यात यश आले.
अचानक पाण्यात चौघीही बुडू लागल्याने नेमकं काय घडतंय हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. यापैकी तिघींचा बुडून मृत्यू झाला. तर आरती गोडबोले या चिमुकलीला वाचवण्यात यश आलं. तिला तातडीने गेवराईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.
या प्रकाराची माहिती मिळताच, पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. नेमकं काय घडलं, महिला आणि दोन मुली कशा बुडाल्या याचा तपास पोलीस करत आहेत. मुलींसह महिला बुडाल्याचं वृत्त मिरगावात वाऱ्यासारखं पसरलं. एकाच घरातील तिघींचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गोडबोले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दोन दिवसांच्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय गेल्यावर्षीच्या पावसामुळेही आधीच गोदावरी नदीला मुबलक पाणी आहे, त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात येतं आहे. काही दिवसांपुर्वी अशीच घटना गेवराई (Gevrai) तालुक्यात घडली आहे.
वारंवार घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमुळे नदी काठावर धोबीघाट बांधण्याची मागणी पुढे येत आहे. दरवर्षी गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर अशा घटना घडतात. नदीला पूर आल्यानंतर नदीकाठच्या लोकांना केवळ सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतो. मात्र अशा घटना टाळण्यासाठी नदी काठावर धोबीघाट तयार करावा जेणेकरून हकनाक निष्पाप जीव जाणार नाहीत अशी मागणी स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी माध्यमातून केली आहे.