BEED24

चिंताजनक…. राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ….आढळून आला नवा कोरोना स्ट्रेन

मुंबईः दि.१९- राज्यातील करोनाबाधितांच्या (corona positive) संख्येत आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर करोनाबाधित वाढत असुन, करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. काल पाच हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाल्याने राज्याचे टेन्शन वाढले आहे. राज्यात गेल्या २४ तासात ६ हजार ११२ नवे करोनाबाधित (corona positive) वाढले असुन, ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८७ हजार ६३२ वर पोहचली आहे.

याशिवाय मागील २४ तासांमध्ये राज्यात २ हजार १५९ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात १९ लाख ८९ हजार ९६३ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बेर होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ३२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४४ हजार ७६५ असुन, आजपर्यंत ५१ हजार ७१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४८ टक्के एवढा आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,८८,३२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ८७ हजार ६३२ (१३.३९ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ८७ जण गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ५८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

अमरावती आणि यवतमाळमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनचे (New corona strain) रुग्ण

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्ह्यात २८ फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाचा नवा स्ट्रेन (New corona strain) यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अशातच अमरावती आणि यवतमाळमध्ये सापडलेल्या रुग्णांबाबत कोरोना राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरवातीला अमरावती आणि यवतमाळमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण आढळल्याची माहिती कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली होती.

डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अमरावतीमध्ये चार रुग्णामध्ये एक E484k म्हणून स्ट्रेन आला आहे. स्पाईक प्रोटीनचा स्ट्रेन आहे. यू.के. आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो मिळताजुळता आहे. या स्ट्रेनची प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते किंवा तो अधिक वेगाने पसरतो. अमरावतीमधल्या 4 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.
तसेच, हा नवा स्ट्रेन अधिक वेगात फैलावू शकतो. त्यामुळे येत्या काळात शासनाला मिनी कन्टेन्मेट तसंच मायक्रो कन्टेन्मेट झोन करावे लागतील आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. त्याच अनुषंगाने अकोल्यात रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला रिजनमध्ये या स्ट्रेनचा जास्तीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि यवतमाळमध्ये एक N444 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अजूनही आपल्या व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटने याबाबतची सविस्तर माहिती दिलेली नाहीय. पण या स्ट्रेनमधून होणारा कोव्हिड आणि नॉर्मल कोव्हिड यामध्ये जास्त फरक नसेल”, असं डॉ. शशांक जोशी म्हणाले.

Exit mobile version