अभिनंदन… जिल्ह्यातील पहिल्या डायलेसिस कोरोना रुग्णाची आज होणार सुट्टी
आरोग्य विभागाने केले २८ दिवसांचे नियोजन

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) येथील डायलेसिसवर असलेल्या पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची आज दि.१२ शुक्रवार रोजी रुग्णालयातून सुट्टी होणार असुन आरोग्य विभागाने सदरील रुग्णाच्या पुढील २८ दिवसाची आरोग्य सेवेचे नियोजन करुन अभिनंदनिय कार्य केले आहे.
शहरात दि.२८ मे रोजी आढळून आलेला कोरोना बाधित तरुण डायलेसिसवर असताना कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाला. “एवढ्या मोठ्या आजाराला मी तोंड देतोय कोरोना काय चिज आहे” अशी प्रतिक्रिया देणाऱ्या या योध्द्याचे अभिनंदन होत आहे. जिल्ह्यातील पहिला डायलेसिसचा या रुग्णाचा दि.११ रोजी घेतलेला दुसरा स्वॕबचा अहवालही निगेटिव्ह आला. आज दि.१२ रोजी रुग्णालयातून त्याची सुट्टी होत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन त्याचे डायलेसिस करुन सुट्टी देणार आहे. तर पुढील २८ दिवसाच्या गृहविलगीकरणाचेही नियोजन आरोग्य विभागाने केले असुन दर चार ते सहा दिवसांनी बीड येथे त्याचे डायलेसिस करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.