अहिल्यादेवी जयंती घरात साजरी करा- माधव निर्मळ

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत असून जयंती उत्सव समाज बांधवानी घरात राहुन साजरा करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी केले आहे.
देशभर सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु असून देशासह महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याकाळात राज्यातही मोठे संकट निर्माण झाले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. हळूहळू कोरोनाचे लोन स्थानिक पातळीवर आले आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक सण उत्सव अगदी साध्या पध्दतीने घरातच साजरी करण्यात आली आहेत. आपली व कुटूंबियांची काळजी घेत समुहाने अथवा एकत्रित जमाव करणे जनतेच्या जिविताशी खेळण्या सारखे आहे. याचे भान ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता येत्या रविवारी साजरी होत असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीही समाज बांधवानी घरातच साजरी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी केले आहे.