
गेवराई/अंबाजोगाई दि.१४(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील संशयित रुग्ण दगावल्याच्या घटने पाठोपाठ अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका ४० वर्षीय कोरोना संशयिताचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपुर्वी गेवराई तालुक्यात कोरोना सदृश्य लक्षणामुळे एका संशयिताची स्वॕब नमुने पाठवण्यात आलीली होती. सदरील रुग्णाचे नमुने निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र काल मध्यरात्री त्याचे निधन झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असताना अंबाजोगाईतही आज एका संशयिताचा मृत्यू सकाळी ९.३० झाल्याची घटना घडली. संशयित मुळचा ओरीसा राज्यातील आहे. एक बोअरवेलच्या गाडीवर तो मजुरी करत असे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे त्याला स्वारातीच्या आयसोलेशन वाॅर्डात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोमवारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अद्याप रिपोर्ट आलेला नाही. आज सायंकाळपर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही हे समजू शकणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. दोन्ही संशयिताच्या मृत्यूचे कारण आज संध्याकाळी कळणार असले तरी जिल्ह्यात खळबळ माजली आहे.