दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केले लातूरकरांचे अभिनंदन….

लातूरः दि.१९- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. आम आदमी पार्टीने लातूर (Latur) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यश मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लातूरकरांचे अभिनंदन केले आहे.
आम आदमी पक्षानं (AAP) मराठवाड्यात व्हाया लातूर (Latur) आपलं खातं उघडलं आहे. लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत ‘आप’चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. लातूर जिल्ह्याचे आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात ‘आप’ दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांवर ताबा मिळवत ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे.
विजयानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मराठीत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. आपचे अजिंक्य शिंदे यांनी या विजयासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. त्याला रीट्विट करत केजरीवालांनी मराठीत ट्वीट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे.