त्या “अल्पवयीन” विवाहितेचा गळा दाबुन खून
बेपत्ता झाल्याची केली होती तक्रार

वडवणीः तालुक्यातील चिखलबीड येथील बेपत्ता अल्पवयीन विवाहितेचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा पिंपळा शिवारात उसाच्या शेतात आढळून आला. पोलिस तपासात सदरील प्रकार हा खुनाचा असल्याचे बुधवारी समोर आले असुन वडवणी पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शितल दादासाहेब तोगे हिचा विवाह गतवर्षी झाला होता. तिचे माहेर पिंपळा असून ती गेल्या पाच दिवसांपुर्वी चिखलबीड येथून बेपत्ता होती. याप्रकरणी हरवले असल्याची तक्रारी नंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यामुळे आई वडीलांवर गुन्हा नोंदवला होता. मंगळवार दि.३० रोजी पिंपळा येथील एका ऊसाच्या शेतात रात्री उशिरा तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिस तपासात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चंद्रसेन कचरु माळी यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश टाक तपास करीत आहेत.