त्या बेपत्ता बालकाची अपहरण करुन हत्या?

बीडः वडवणी तालुक्यातील ताडसोन्ना गावातून हरवलेल्या बालकाचे एका बंधाऱ्यात तारेने बांधलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले असून अत्यंत क्रुरपणे अंगावरील दागिने घेवून त्याची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात असुन तात्काळ घटनेचा तपास लावून आरोपीला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वडवणी तालुक्यातील ताडसोन्ना येथील रहिवाशी ॲड. राजाभाऊ रामदास चोले यांचा तीन वर्षाचा हर्ष दि.२८ मंगळवार सकाळी ९ वाजल्यापासुन हरवला होता. शोध घेवूनही आढळून न आल्याने पिंपळनेर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांत हर्षचे अपहरण झाल्याचीही शंका व्यक्त केली जात होती. सोशल माध्यमातून बालकाच्या हरवल्याचे व सापडल्यास आणुन सोडण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र चौथ्या दिवशी सदरील बालकाचे प्रेत गावाजवळील बंधाऱ्यात अत्यंत हृदयद्रावक पध्दतीत आढळून आले. सदरील बालकाच्या अंगावरील दागिने काढलेल्या, कंबरेस तार बांधलेली व ती तार एका दगडं भरलेल्या खताच्या पिशवीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदरील बालकाच्या पार्थिवावर बीड येथे शवविच्छेदन करुन गावात काल दि.३१ अॉगस्ट रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण करुन चोरी व हत्या केल्याने सर्वत्र राग व्यक्त होत असुन पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ तपास लावावा व आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.