कोरोंना विशेष

धारुरात “कोरोना बाईक”….

अमेरिकेतून वर्गमित्राची मदत

किल्लेधारूर दि.१४- शहरात सोन्याची कारागिरी करुन उपजिविका भागवणाऱ्या वर्गमित्राची कोरोना संकट काळात थेट अमेरिकेत राहणाऱ्या मित्राने मित्राची गरज विचारुन मोटार सायकल घेण्यासाठी मदत केली. या मित्राने सदरील मोटार सायकलवर “कोरोना” लिहून या मदतीला अजरामर करण्याचा प्रयत्न केला.

किल्लेधारूर शहर हे सोन्या चांदीची प्रसिध्द नावाजलेली बाजारपेठ. या शहरात सराफा व सोन्या चांदीच्या कारागिरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या व्यवसायासाठी विविध भागातून व परराज्यातुन कारागीर येवून उपजिविका करतात. येथे सोन्याच्या कारीगीरीसाठी वीस वर्षापूर्वी पाथरी येथून नारायण रतनराव शहाणे कै.सुधीर खिलोजी यांच्या मदतीने धारुरला आले. उत्कृष्ट कारीगीरीमुळे शहाणे यांनी धारुरला जम बसवला व येथेच आपल्या पत्नी व तीन मुलांसह स्थायिक झाले. शहाणे यांनी कारागीरी करत आठ वर्षापूर्वी स्वतः चा सराफा व्यवसाय सुरु केला. अनेक व्यापाऱ्यासह जवळच्या शिंदी, गप्पेवाडी, घाटेवाडी, धुनकवाड या खेडेगावात जावून ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा व्यवसाय सुरु करुन प्रपंच चालवला.

मार्च महिन्यात अचानक सर्वच व्यापाऱ्यांवर कोरोना महामारीचे संकट कोसळले. याचा फटका शहाणे यांनाही बसला. कसाबसा होणारा व्यवसाय लॉकडाऊन मुळे अडचणीत आला. स्वतः चे वाहन नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली. जूने येणे वसुली मोठ्या प्रमाणात थकली. व्यवसाय बंद पडला. याकाळात कधीमधी ओळखीच्या लोकांची दुचाकी घेवून थकबाकीदाराकडे जावून प्रपंच भागवण्याचा प्रयत्न सुरु झाला. यातच शिंदी येथील लक्ष्मण पारवे यांनी सराफा व्यवसाय अडचणीत आल्यामुळे खवा विक्रीचा सल्ला दिला. यावर तात्काळ शहाणे यांनी होकार देत पारवे यांच्या मदतीने खवा विक्रीचा नवीन व्यवसाय सुरु केला. या व्यवसायात त्यांना रोज चारशे ते पाचशे रुपयांचा रोजगार मिळू लागला. मात्र गावोगाव व घरोघर खवा पोहोच करायला वाहनाची अडचण होतीच.

खवा विक्री करण्यातही शहाणे यांनी कधी याची तर कधी त्याची मोटार सायकलची मदत घेवून रोजगार सुरु ठेवला. याच वेळी एप्रिल महिन्यात त्यांचे पाथरी येथील वर्गमित्र प्रदिप शेषराव लांडगे यांचा फोन आला. लांडगे हे गेल्या सहा वर्षांपासुन अमेरीकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. आपल्या मित्राची लॉकडाऊन मध्ये ख्यालीखुशाली विचारण्यासाठी लांडगे यांनी शहाणे यांना फोन केला. यावेळी मित्राची अडचण समजून घेत थेट अमेरिकेतून शहाणे यांच्या बँक अकाऊंट वर पन्नास हजारांची मदत पाठवली. शहाणे यांनी मित्राने केलेल्या मदतीतून केज येथून जुनी मोटार सायकल खरेदी केली. आणि रोजची नितांत गरज पुर्ण केली. या मदतीला अजरामर करण्यासाठी शहाणे यांनी त्या दुचाकीवर “कोरोना” नाव कोरत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जूनमध्ये सुरु झालेल्या अनलॉक मध्ये शहाणे यांचा पांरपारिक सराफा व्यवसाय सुरु झाला असुन या कोरोना बाईकचा वापर त्यांच्या व्यवसायासाठी करत आहेत. या मदती बाबत बोलताना नारायण शहाणे यांनी ही माझ्या जीवनातील सर्वोत्तम मदत असून कधीही न विसरणारी असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!