पतीकडून पत्नीस विष पाजून मुलीला पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) पतीकडून पत्नीस विषारी औषध पाजून तर मुलीस पाण्याच्या हौदात ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज दि.२७ बुधवार रोजी सकाळी धारुर पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सोनवळा ता. अंबाजोगाई येथे घडली.
सदरील महिलेस अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबधित महिला पुर्ण बरी असून तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. किरकोळ कारणावरुन पती वसंत केशव पतंगे (४०) याने पत्नी आशा (३४) हिस विषारी औषध पाजुन घरात डांबले तर मुलगी आकांक्षा (१७) हिस घरातील पाण्याच्या हौदात डकलून दिले. सदरील घटना महिलेचे सासरे केशव पतंगे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सून आशा हिस स्वा.रा.ति. रुग्णालय अंबेजोगाई येथे उपचारासाठी हलवले. याबाबत स्वा.रा.ति. पोलिस चौकीत संपर्क साधला असता सदरील घटनेची नोंद करण्यात आली असल्याचा दुजोरा मिळाला. अद्यापपर्यंत याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.