बँक ग्राहक केंद्रावर कारवाई नाहीच

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) दि.३० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँक ग्राहक केंद्र तात्काळ मुळ मंजूर गावात हलवण्याचे काढलेल्या आदेशावर येथील तहसील प्रशासन व बँकांनी अद्याप कारवाई केली नसुन शहरात अनाधिकृतरित्या सुरु असलेली सिएसपी व सिएससी केंद्र तात्काळ स्थलांतर करावित अशी मागणी होत आहे.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दि.३० रोजी सर्व तहसीलदार व बँकांना पत्राद्वारे सिएसपी व सिएससि केंद्र ज्या गावत मंजूर आहेत तेथे तात्काळ हलविण्याचे आदेश काढले होते. या आधारे येथील तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सर्व बँकांना कारवाईचे आदेश काढले. गावात मंजुर असलेले सिएसपी व सिएससि केंद्र अनाधिकृतरित्या शहरात चालवली जातात. यामुळे ग्रामीण भागातील वयोवृध्द, अपंग व निराधारांची मोठी गैरसोय होते. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दखल घेत आदेश काढले. मात्र दहा दिवस उलटूनही अद्याप ही केंद्र मुळ मंजूर गावात स्थलांतरीत झालेली नाहीत. याबाबतीत नायब तहसीलदार सुहास हजारे यांना माहिती विचारली असता थेट प्रत्यक्ष भेटी देवून कारवाई करणार असल्याचे सांगितले.