बापच निघाला मुलीचा मारेकरी
आरोपीस सात दिवसाची पोलिस कोठडी

वडवणी दि.२ (प्रतिनिधी) तालुक्यातील चिखलबीड येथील शितल दादासाहेब तोगे (१४) या अल्पवयीन बेपत्ता विवाहितेचा मृतदेह तिचे माहेर असणाऱ्या पिंपळा शिवारात एका उसाच्या शेतात सापडला होता. पोलिसांनी तपास केला असता यामध्ये बापानी स्वतःच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पोलिसांनी अटक करून आज सकाळी कोर्टासमोर हजर केले असता त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शितल दादासाहेब तोगे (१४) हिचा विवाह गेल्या वर्षी झाल्याचे समजते तरी तिचे माहेर जवळच असणारे पिंपळा असुन तरी शितल हि गेल्या दोन दिवसापासून सासर चिखलबीड येथून बेपत्ता होती. सासर कडील व माहेर कडील नातेवाईक तिचा शोध घेत होते. मंगळवारी रात्री उशिरा शितल हिचा मृतदेह तिच्या माहेर असणाऱ्या पिंपळा येथील एका उसाच्या शेतात सापडला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असुन वडवणी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार या विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसानी या विवाहितेचा खरा मारेकरी कोण यासाठी मुलीचे आई-वडिलांसह इतर काही व्यक्तींना चौकशीसाठी आणले असता चौकशी अंती मुलीच्या बापानेच मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.