मठ गल्लीत डेंग्यूचा नवीन रुग्ण;
धारुरात डेंग्यूची साथ

किल्लेधारूर दि.८(वार्ताहर) शहरातील मठ गल्लीत आज पुन्हा एक डेंग्यूचा नवीन रुग्ण मिळाला असून पुर्वी पाठवलेल्या चार पैकी दोघांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली आहे.
शहरातील कसबा विभागात मठ गल्ली तापीच्या रुग्णांमुळे प्रकाशझोतात आली होती. याभागात हिवताप निवारण विभागाने भेट देवून ॲबिटींग, फोंगिंग मशीनने फवारणी करण्याच्या सुचना नगर परिषदेस दिल्या होत्या. याभागातील चौघांचे रक्ताचे नमुने आरोग्य विभागाने पाठवले होते. यापैकी दोघांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले असून आज एका रुग्णाचा खाजगी तपासणीत रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. याभागात डेंग्यूची साथ असल्याचे सिध्द झाले असुन आरोग्य विभागाकडून लवकरच पुढील कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. डॉक्टर्स असोशियनचे अध्यक्ष डॉ. मयूर सावंत यांनी याभागातील नागरीकांनी स्वच्छतेला प्राधान्य देत ड्राय डे पाळून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना धारुर शहरात डेंग्यूने उच्छाद मांडल्याचे दिसत आहे.